ताज्या घडामोडी

आदि कर्मयोगी अभियान’ मध्ये जिल्हा अग्रेसर राहावा – जिल्हाधिकारी विनय गौडा

चंद्रपूर : सन 2047 पर्यंत विकसीत भारत घडविण्यासाठी, समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत सेवा व लोककेंद्रीत विकासाची पुर्तता होणे आवश्यक आहे. त्यासाठीच प्रतिक्रियाशील सुशासन कार्यक्रमाचा भाग म्हणून केंद्रीय आदिवासी कार्य मंत्रालयाने ‘आदि कर्मयोगी अभियान’ सुरू केले आहे. या अभियानात चंद्रपूर जिल्हा अग्रेसर राहावा, यासाठी सर्व यंत्रणांनी योग्य समन्वयातून काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूरच्या वतीने नियोजन सभागृह येथे आयोजित तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. पुढे जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, ‘आदि कर्मयोगी अभियान’ हे केंद्र शासनाचे अतिशय महत्वाकांक्षी अभियान आहे. या अंतर्गत मास्टर ट्रेनर तयार करून तसेच लोकांचा सहभाग घेऊन प्रत्येक आदिवासी गावातील समस्यांची मांडणी असलेले डॉक्युमेंट तयार केले जाईल. जेणेकरून ‘विकसित भारत – 2047’ च्या व्हीजन डॉक्युमेंटमध्ये त्याचा समावेश करता येईल. त्यासाठी राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि ग्रामस्तरावर तज्ज्ञांमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या अभियानात 1. पीएम जनमन योजना, 2. धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान, 3. राष्ट्रीय सिकलसेल उच्चाटन मोहीम आणि 4. एकलव्य निवासी शाळांचा विस्तार आणि शिष्यवृत्ती या व इतर योजनांचे एकत्रिकरण करून व्हीजन डॉक्युमेंट तयार करावयाचे आहे. मुख्य म्हणजे यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांची मुख्य जबाबदारी राहणार आहे. केंद्र आणि राज्य स्तरावरून या अभियानाचा नियमित पाठपुरावा सुरू असून 2 ऑक्टोबर 2025 च्या ग्रामसभेत हा आराखडा मंजूर करून घ्यावयाचा आहे. त्यामुळे यात प्रत्येक यंत्रणेचा सहभाग आवश्यक आहे. त्यासाठी योग्य समन्वय व सुक्ष्म नियोजन करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या.

प्रास्ताविकात प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार म्हणाले, धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानात चंद्रपूर जिल्ह्यातील 167 गावे तर पीएम जनमन योजनेत 68 गावांचा समावेशा आहे. आदिवासी गावांमध्ये आरोग्य, शिक्षण, पोषण, रोजगार, पाण्याची उपलब्धता करणे आाणि शासनाशी संपर्क ठेवण्यासाठी ‘आदि कर्मयोगी अभियान’ सुरू करण्यात आले आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनीसुध्दा मार्गदर्शन केले. कार्यशाळेला सर्व विभागांचे प्रमुख, जिल्हास्तरीय तज्ज्ञ प्रशिक्षक, गटविकास अधिकारी, नोडल अधिकारी आदी उपस्थित होते.

‘आदि कर्मयोगी अभियानाबाबत माहिती’ : आदिवासी भागात तळागाळातील शासन व सेवा वितरणामध्ये आमुलाग्र परिवर्तन घडविणे, आदिवासी समुदायांना सशक्त करण्यासाठी प्रतिक्रियाशील सुशासन कार्यक्रमांतर्गत नेत्यांचे कॅडर निर्माण करणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. सेवा, समर्पण आणि संकल्प या तत्वावर हे अभियान राबविले जाणार असून आदिवासी भागांमध्ये प्रतिसादक्षम शासन आणि शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहचवली जाईल. भारतामध्ये 10.5 कोटी आदिवासी नागरीक आहेत, जे 30 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये राहतात. या आदिवासी समुदायांच्या सक्षमीकरणासाठी संपूर्ण भारतात 20 लक्ष परिवर्तनशील नेत्यांचे मिशन आधारीत कॅडर निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये