महसुली अपील संदर्भात 16 सप्टेंबर तर फेरफार प्रकरणी 17 सप्टेंबर रोजी लोक अदालत…

चंद्रपूर : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रलंबित अपील प्रकरणी 16 सप्टेंबर रोजी तर फेरफार प्रकरणासंदर्भात 17 सप्टेंबर रोजी लोक अदालत आयोजित करण्याच्या सूचना जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयाला दिल्या आहेत.
त्याअनुषंगाने जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, चंद्रपूर कार्यालयाच्यावतीने मंगळवार दि. 16 सप्टेंबर रोजी महसुली अपील प्रकरणासंबंधाने लोक अदालत जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय, रुम नं. 24, 2 रा माळा, प्रशासकीय भवन, चंद्रपूर येथे आयोजित केली आहे. सदर लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्याचे नियोजन केले आहे. तरी सर्व नागरिकांनी सदर लोक अदालतीत सहभाग नोंदवावा.
तालुका स्तरावर फेरफार प्रकरणांची लोकअदालत : जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, चंद्रपूर कार्यालयाच्या अधिनस्त तालुका स्तरावरील सर्व उपअधिक्षक भूमि अभिलेख कार्यालय, यांच्याकडील प्रलंबित फेरफार प्रकरणी, बुधवार दि. 17 सप्टेंबर रोजी फेरफार अदालत आयोजित केली आहे. सदर लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे निकाली करण्याचे नियोजन केले आहे.
वरील दोन्ही लोकअदालतीमध्ये सर्व नागरिकांनी सहभाग नोंदवून संबंधित कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख प्रदीप जगताप व सर्व अधिनस्त उपअधीक्षक भूमि अभिलेख यांनी केले आहे.