ताज्या घडामोडी

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मदतीचा वाढता आलेख

चंद्रपूर : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी अंतर्गत जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना उपचारासाठी दिलासा मिळत असून, मागील आठ महिन्यांच्या कालावधीत एकूण 64 रुग्णांना 57 लाख 48 हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या देखरेखीखाली कार्यरत असलेल्या जिल्हा कक्षामार्फत ही मदत वितरित करण्यात आली. जानेवारी ते जुलै या कालावधीत 54 रुग्णांना 47 लाख 48 हजार, ऑगस्टमध्ये 7 रुग्णांना 6 लाख, तर 15 सप्टेंबरपर्यंत 3 रुग्णांना 4 लाख रुपये इतकी मदत मंजूर करण्यात आली आहे.

सदर निधीतून हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुप्फुस व अस्थिमज्जा प्रत्यारोपण, कॅन्सर उपचार, कॉकलियर इम्प्लांट, अस्थिबंधन, गुडघा व खुब्याचे प्रत्यारोपण, नवजात शिशु व बालकांच्या शस्त्रक्रिया तसेच अपघातग्रस्त रुग्णांच्या उपचारांसाठी सहाय्य दिले जाते. निधी प्राप्त न झाल्यास रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत उपचाराची पर्यायी माहिती दिली जाते.

निधीसाठी पात्रता निकषांनुसार अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. वार्षिक उत्पन्न 1 लाख 60 हजार रुपयांपेक्षा कमी असावे व उपचार सरकारी/धर्मादाय/मान्यताप्राप्त रुग्णालयात झालेले असावेत. आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव संबंधित रुग्णालयाकडून सादर होऊन जिल्हा कक्षामार्फत मंत्रालयाकडे पाठविला जातो. समिती परीक्षणानंतर निधी मंजूर केला जातो.

संपर्कासाठी टोल फ्री क्रमांक 1800 123 2211, संकेतस्थळ cmrf.maharashtra.gov.in तसेच प्रशासकीय इमारत, पहिला मजला, चंद्रपूर आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, चंद्रपूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कक्षाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कविश्वरी कुंभलकर यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये