ताज्या घडामोडी

वंचित, दुर्बल घटकांना शासकीय सेवांचा लाभ द्या

चंद्रपूर  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन 17 सप्टेंबरपासून ते 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत राबविण्यात येणा-या सेवा पंधरवाड्यात नागरिकांशी संवाद आणि संपर्क झाला पाहिजे. वंचित आणि दुर्बल घटकांपर्यंत पोहचून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासकीय सेवांचा लाभ देणे हे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियोजन भवन येथे आयोजित ‘सेवा पंधरवडा’ कार्यक्रमाचा शुभारंभ करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार सर्वश्री सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक ईश्वर कातकाडे आदी उपस्थित होते.

‘सेवा पंधरवडा’चा शुभारंभ झाला असे सांगून पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, पाणंद रस्ते शेतक-यांसाठी अतिशय महत्वाचे आहे. या पंधरवड्याच्या निमित्ताने पाणंदरस्ता मुक्त गाव आणि जिल्हा करण्यासाठी प्रयत्न करा. नागरिकांना घरकुलाचे पट्टे नसल्याने त्यांना शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागते. त्यामुळे नागरिकांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने मिशन मोडवर काम करावे. त्यासाठी कृती आराखडा तयार करावा. तसेच वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 करण्याकरीतासुध्दा मोहीम हाती घ्यावी. प्रत्येक गावात स्मशानभुमी, तसेच त्यासाठी जाणारा रस्ता, शेड बांधावे. याबाबत एकाही गावाची तक्रार येणार नाही, याची काळजी घ्यावी. नागरिकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी सुक्ष्म नियोजन करा, अशा सुचना पालकमंत्री डॉ. उईके यांनी दिल्या.

प्रास्ताविकात जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत्‍ 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा राबविण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाने यासाठी 3 टप्प्यात नियोजन केले असून पहिल्या टप्प्यात पाणंद रस्ते मोहीम, दुसरा टप्पा सर्वांसाठी घरे आणि तिस-या टप्प्यात नाविण्यपूर्ण उपक्रम अंतर्गत्‍ प्रत्येक गावात स्मशानभुमी आणि वर्ग 2 जमीन वर्ग 1 मध्ये रुपांतरीत करणे. यासाठी महसूल विभागाने पूर्ण तयारी केली असून गावागावात शिबीर घेऊन प्रत्येकाला लाभ देण्याचा प्रयत्न आहे.

कार्यक्रमाचे संचालन अजय मेकलवार यांनी तर आभार उपविभागीय अधिकारी संजय पवार यांनी केले. कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदी उपस्थित होते.

उत्तम, गतिमान आणि पारदर्शक सेवा देण्याचा संकल्प करा – आमदार सुधीर मुनगंटीवार

छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे रयतेचे राज्य होते. छत्रपतींच्याच नावाने महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे. त्यामुळे हा संकल्पाचा दिवस आहे. सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने जनतेला उत्तम, गतिमान आणि पारदर्शक सेवा देण्याचा सर्वांनी संकल्प करावा, असे प्रतिपादन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. पुढे ते म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पूर्ण शक्तीने देशासाठी काम करीत आहे. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी काम करावे. देशाच्या आणि राज्याच्या जीडीपीत चंद्रपुरचे योगदान सर्वात पुढे राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

चंद्रपूर जिल्हा पाणंद रस्ता मुक्त करण्यासाठी निधी द्यावा – आमदार किशोर जोरगेवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा राबविण्यात येत आहे. या अंतर्गत महसूल विभागाच्या वतीने पाणंद रस्ते मोहीम हाती घेण्यात येणार आहे. पाणंद रस्ते ग्रामीण भागाची जीवनवाहिनी आहे, जिल्ह्यात ब-याच पाणंद रस्त्यांची नोंद नाही, असेही रस्ते मोकळे करावे. चंद्रपूर जिल्हा पाणंद रस्ता मुक्त करण्यासाठी पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.

पुढे ते म्हणाले, सर्वांसाठी घरे ही महत्वाची मोहीम आहे. शहरातील 55 झोपडपट्टीवासियांना घरपट्टे दिले पाहिजे. पर्यटनाच्या दृष्टीकोनातूनही चंद्रपूर जिल्ह्याचा विकास व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप : शहीद कॉन्स्टेबल नंदकुमार देवाजी आत्राम यांची वीरमाता ताराबाई आत्राम यांना 1.67 हे.आर. जमीन वाटपाचे तसेच शहीद कॉन्स्टेबल सुनील अभिमान रामटेके यांची वीरपत्नी अरुणा सुनील रामटेके यांना 1.80 हे.आर. जमीन वाटपाचे प्रमाणपत्र सेवा पंधरवड्या निमित्त पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. याशिवाय विठ्ठल पवार, मनोहर घोसरे यांना वनहक्क अंतर्गत घराकरीता पट्टा, प्रशांत कस्तुरे, गोपाळ महाडोरे यांना सर्वांसाठी घरे अंतर्गत पट्टे, ईश्वर कुमरे, दिवाकर कुमरे, भिवराबाई तिवाडे, प्रभाकर हनवटे यांना स्वामित्व योजनेंतर्गत पट्टा वाटप प्रमाणपत्र देण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये