ताज्या घडामोडी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्याचा नावलौकिक करा – पालकमंत्री डॉ. अशोक उईके

चंद्रपूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत राज्य शासनाच्या वतीने ‘सेवा पंधरवडा’ राबविण्यात येत आहे. या माध्यमातून राज्यातील प्रत्येक गाव समृद्ध करण्यासाठी आजपासून ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ चा शुभारंभ होत आहे. गावाच्या सर्वांगीन विकासासाठी महत्वाच्या असलेल्या या अभियानामध्ये जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी उत्कृष्ट काम करून जिल्ह्याचा नावलौकिक करावा, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले.

मोरवा (ता. चंद्रपूर) येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ करताना ते बोलत होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायगुडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मीना साळुंखे (पंचायत), नूतन सावंत (सामान्य), शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे, गटविकास अधिकारी संगिता भांगरे मोरव्याच्या सरपंच स्नेहा साव उपस्थित होत्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ राज्यस्तरावर किनगाव (ता. फुलंब्री, जि. संभाजीनगर) येथून झाला, असे सांगून पालकमंत्री डॉ. अशोक उईके म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात मोरवा ग्रामपंचायतीपासून हे अभियान सुरू होत आहे. त्यामुळे मोरवा गावाने आदर्श निर्माण करावा. गावाच्या विकासानेच राज्याचा व देशाचा विकास होईल. जिल्ह्यात हे अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची जास्त जबाबदारी आहे. तसेच सरपंच, उपसरपंच आणि इतर पदाधिकाऱ्यांनी सुद्धा या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा. लोक चळवळीच्या माध्यमातून हे अभियान यशस्वी करावे.

जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या नेतृत्वात जिल्हा प्रशासन अतिशय चांगले काम करीत आहे. राज्य सरकारच्या 100 दिवसाच्या कृती आराखड्यामध्ये संपूर्ण राज्यातून चंद्रपूर जिल्हा अव्वल राहिला. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सुद्धा चंद्रपूरचा नावलौकिक होईल, यासाठी प्रयत्न करावा, असे पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले.

आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, या अभियानाच्या माध्यमातून गावांचा सर्वांगीण विकास होईल. सरपंच, उपसरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी पुढे येऊन सहभाग घ्यावा. स्पर्धेमध्ये सर्व ग्रामपंचायतींनी आपले योगदान देऊन पारितोषिक मिळवावे आणि चंद्रपूरचे नाव मोठे करावे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन अर्जून चव्हाण यांनी तर आभार मिनाक्षी बनसोड यांनी मानले. सुरवातीला उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. तसेच समृध्द पंचायतराज अभियानच्या जनजागृतीकरीता चित्ररथाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला, गावातील नागरिक उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांचा दूरदृष्यप्रणालीद्वारे सर्व ग्रामपंचायतींसोबत संवाद :

देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त राज्य सरकार ‘सेवा पंधरवडा’ साजरा करीत आहे. त्यानिमित्ताने आज ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा’ शुभारंभ करण्यात आला आहे. कोणतेही गाव मागे राहू नये, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ त्यांना मिळावा, यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात येत आहे. राज्यातील 28 हजार ग्रामपंचायती व 40 हजार गावे मॉडेल करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

किनगाव (ता. फुलंब्री, जि. संभाजीनगर) येथून दूरदृष्यप्रणालीद्वारे ग्रामपंचायतींसोबत संवाद साधतांना ते बोलत होते. पुढे मुख्यमंत्री म्हणाले, सात मुख्य केंद्रबिंदूवर हे अभियान आधारित असून लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचणे हेच आपले कर्तव्य आहे. जलयुक्त शिवार मुळे राज्यातील 20 हजार गावातील दुष्काळ दूर झाला. प्रत्येक गाव जलसमृद्ध आणि स्वच्छ करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. या अभियानात सर्वात मोठा घटक हा लोकसहभाग आहे आणि लोकसहभागातूनच आपल्याला परिवर्तन घडवायचे आहे. या अभियानाच्या माध्यमातून बदललेला महाराष्ट्र आपल्याला दिसेल. देशात पहिल्यांदाच 250 कोटी रुपयांचे पुरस्कार या अभियानाच्या निमित्ताने ग्रामपंचायतींना देण्यात येणार आहे. त्यामुळे आजपासून स्पर्धेला सुरुवात झाली असून सर्व ग्रामपंचायतींनी जिंकण्याचे ध्येय ठेवावे, असेही ते म्हणाले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये