क्रांती हिंदी प्राथमिक शाळेत अभियंता दिन उत्साहात साजरा…

चंद्रपूर : येथील सर्वोदय महिला मंडळाद्वारे संचालित हॉस्पीटल वॉर्डातील क्रांती हिंदी प्राथमिक शाळेत भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांची जयंती ‘अभियंता दिन’ म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये अभियंत्यांच्या योगदानाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाला सबऑर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन (चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली) चे सहसचिव जयवंत पराते, संदीप कोहळे, पवन देवाळकर, संदीप नन्नावरे, मंदार मिराशे, पंकज कुटेमाटे, सागर खोब्रागडे, स्वप्नील डोहे, मनोज डफ, भूषण सोनटक्के, शैलेश बुच्चे, मालवे यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक अनिल कुरसंगे, शिक्षिका प्रियंका देवाळकर यांचीही उपस्थिती होती.
उपस्थित मान्यवरांनी डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या जीवनकार्याचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला. त्यांनी देशाच्या विकासात दिलेल्या योगदानाबद्दल माहिती देत, त्यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्वांपासून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. मुलांसाठी अभियांत्रिकीचे महत्त्व सोप्या भाषेत समजावून सांगण्यात आले, जेणेकरून भविष्यात तेही या क्षेत्राकडे आकर्षित होतील. याप्रसंगी, सबऑर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनने केलेल्या सामाजिक कार्याची माहितीही देण्यात आली. असोसिएशनतर्फे दरवर्षी रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात, तसेच गरजू व्यक्ती आणि सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या संस्थांनाही मदत केली जाते. या माहितीमुळे विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीव झाली. कार्यक्रमाच्या शेवटी, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना नोटबूकचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये एक नवा उत्साह संचारला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.