जिल्हा परिषदेकडून दिव्यांग व मागासवर्गीयांसाठी कल्याणकारी योजना जाहीर

चंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत आर्थिक वर्ष २०२५-२६ करिता दिव्यांग व मागासवर्गीय नागरिकांसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येणार आहेत. इच्छुक लाभार्थ्यांनी १५ जुलै २०२५ पर्यंत संबंधित ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दिव्यांगांसाठी ५ टक्के निधी अंतर्गत तीन चाकी सायकल, पांढरी काठी, श्रवणयंत्र, स्वयंचलित सायकल, कमोड चेअर, ई-रिक्शा व विवाहित जोडप्यांना प्रोत्साहनपर अनुदान या योजनांचा समावेश आहे. तर मागासवर्गीयांसाठी २० टक्के निधी अंतर्गत ९० टक्के अनुदानावर सबमर्सिबल पंप व ऑईल इंजिन, महिलांसाठी सोलर दिवे आणि लघुउद्योगासाठी ७५ टक्के अनुदानावर ई-रिक्शा, झेरॉक्स मशिन इत्यादींचा लाभ देता येणार आहे.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. तसेच सर्व प्रकल्प डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) प्रणालीद्वारे राबविले जाणार असल्याने लाभार्थ्यांच्या बँक खात्याची माहिती अद्ययावत असणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी संबंधित ग्रामपंचायत, पंचायत समिती कार्यालय किंवा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.